विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. आर्थिक गुन्हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे, जनतेनं देखील अशा फसव्या योजनांवर विश्वास ठेवू नये, असं ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. कालबद्ध पद्धतीने हा तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं ही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर ३१८ उद्योगांवर ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
राज्य सरकारनं गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी केली. मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न अतिशय गंभीर असून पोलीस वसाहत, बेस्ट वसाहत यांचा पुनर्विकास करणं ही म्हाडाची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.