केंद्रसरकारच्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘इंडिया ए-आय’ मिशनला अनुसरून, भारतात सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिचालनाचा विस्तार करण्याच्या ‘इंटेल’ या कंपनीच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी, अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप बु टॅन यांच्याशी व्हिडीओ कॅालद्वारे चर्चा केली.
केंद्रसरकारनं फॅब्रिकेशन, डिझाइन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी २०२१ साली ७६ हजार कोटी रुपये खर्चाची ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ ही योजना सुरु केली होती. त्या अंतर्गत, भारतानं २०२५ मध्ये, नोएडा आणि बंगळुरू इथं पहिली तीन नॅनोमीटर चिप डिझाइन केंद्र उघडली आणि पाच सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बांधकामाधीन आहेत.
तर, ‘इंडिया ए-आय’ मिशन अंतर्गत भारतात ए-आय ची निर्मिती करणं आणि भारतासाठी त्याला काम करायला लावणं, यावर लक्ष केंदित कारण्यासाठी केंद्रसरकारनं २०२४ साली १० हजार ३७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती.
या अभियानाच्या सात प्राधान्यक्रमांमध्ये संगणकीय पायाभूत सुविधा, ए-आयकोश, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, कौशल्य, स्टार्टअप निधी पुरवठा आणि सुरक्षित एआय विकास याचा समावेश आहे.