ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव त्यांना मिळालं. वो कौन थी, शहीद, रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम, उपकार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.