January 4, 2026 1:57 PM

printer

व्हेनेझुएला मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या आपत्कालीन बैठक

व्हेनेझुएला मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने उद्या, सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सुरक्षा परिषदेचा अ-स्थायी सदस्य असलेल्या कोलंबियाच्या विनंतीवरून ही बैठक बोलावली असून, त्याला चीन आणि रशिया, या स्थायी सदस्य देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना काल अमेरिकेनं अटक केली असून, त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांच्या  पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

अमेरिकेच्या या कारवाईबद्दल  संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली असून, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. व्हेनेझुएलामधल्या कायद्याच्या राज्याचं आणि मानवी हक्कांचा आदर राखून सर्वसमावेशक संवादाचं आवाहन त्यांनी केल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता  स्टीफन दुजारिक यांनी जारी केलेल्या   निवेदनात म्हटलं आहे. 

दरम्यान, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांच्यावर न्यू यॉर्क इथल्या  न्यायालयात  आरोप निश्चित करण्यात आल्याचं अमेरिकेचे टर्नी जनरल पाम बोंडी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेविरोधात नार्को-दहशतवादाचा कट रचल्याचा, तसंच विध्वंसक उपकरणं  बाळगण्याचा त्यांच्यावर आरोप असून,  त्यांच्यावर उद्या खटला चालवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.  

दरम्यान, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यानं  अटक केल्याबद्दल जगभरात निषेधाच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

व्हेनेझुएला मधल्या सध्याच्या घडामोडींबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवत असून, व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं पूर्ण सहकार्य  असल्याचं  परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

रशिया, चीन, इराण, ब्राझील आणि क्युबासह अनेक देशांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा निषेध केला असून, हे  व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं  उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

युरोपियन युनियनचं परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांची सनद, याचा आदर करण्यावर युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी भर दिला आहे.