व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय सातत्य आणि देशाची व्यापक सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, व्हेनेझुएलामधल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत ‘स्पेसएक्सच्या मालकीची स्टारलिंक सेवा व्हेनेझुएलामध्ये येत्या ३ फेब्रुवारीपर्यंत मोफत ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणार असल्याचं टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जाहीर केलं आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळावा, सध्या व्हेनेझुएलामध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, आपल्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात, आणि आपत्कालीन परिस्थितीत कराकस इथल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयानं जारी केल्या आहेत.