वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शौर्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 मुलांना या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलं असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्रालयानं सांगितलं. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात देशाचा समृद्ध वारसा आणि शौर्याची भावना दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पाहायला मिळतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना प्रधानमंत्री संबोधितही करणार आहेत. श्री गुरु गोविंद सिंह जी यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी-साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ पाळला जातो. जानेवारी 2022 मध्ये गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वादरम्यान पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा याची घोषणा केली होती.