भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे, आणि वंदे मातरम् हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा झाली, त्यावेळी मोदी बोलत होते. ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे, असं मोदी म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला. तसंच काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. या चर्चेत भाग घेताना कॉंगेस नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी वंदे मातरम् हा राष्ट्राचा आत्मा असल्याचं सांगितलं. सरकार यावरून राजकारण करत असून लोकांचं लक्ष त्यांच्यापुढील मुख्य प्रश्नांपासून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॉँग्रेस नेते गौरव गोगोई यांनीही या चर्चेत भाग घेतला.