समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे. लोकसभेत आज वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरूवात करताना ते बोलत होते. ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. वंदे मातरम् ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरम् चं ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला. तसंच काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली.
वंदे मातरम हा समर्पण आणि एकतेचा एक कालातीत मंत्र असून भारताच्या स्वावलंबन आणि प्रगतीच्या संकल्पाला तो प्रेरणा देतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या चर्चेत म्हणाले.
बंगालच्या पवित्र भूमीने भारताला फक्त वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत नाही, तर देशाला त्याचं राष्ट्रगीतही दिलं, असं प्रतिपादन काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी या चर्चेदरम्यान केलं. तसंच प्रधानमंत्र्यांनी या चर्चेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही गोगोई यांनी केली. वंदे मातरम गीतावरच्या चर्चेद्वारे सरकार सध्याच्या आव्हानांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केली आहे. वंदे मातरम हे गीत देशाचा आत्मा आहे आणि त्यावर कोणताही प्रतिवाद होऊ शकत नाही, असं गांधी म्हणाल्या.
धर्माच्या आधारावर होणारं राजकारण फेटाळून लावणं हा वंदे मातरमचा उद्देश होता असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले. श्रीरंग बरणे, अरविंद सावंत, भास्कर भगरे यांच्यासह विविध खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला.)