देशातली पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ लवकरच सुरु होणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गोहाटी आणि कोलकाता दरम्यान धावेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हाय-स्पीड चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून, या गाडीला १६ डबे आहेत, आणि एक ते दीड हजार किलोमीटर इतक्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
वंदे भारत स्लीपर ट्रेन आरामदायक स्लीपर बर्थ, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक शौचालयं यासारख्या अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असल्याचं ते म्हणाले.