उत्तर प्रदेशात बुलंदशहर इथे भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर आणि कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ३४ वर घाटाल इथे काल रात्री हा अपघात झाला. हा ट्रॅक्टर कासगंजकडून राजस्थानात गोगामेडी इथे जात होता.
या ट्रॅक्टरमध्ये ६१ प्रवासी प्रवास करत होते. वेगाने येणाऱ्या कंटेनरने या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने तो उलटून हा अपघात झाला. जखमींना खुर्जा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.