उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. वातावरण निवळल्यावर अडकलेल्या लोकांना जलदगतीने बाहेर काढलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. आतापर्यंत ३७२ जणांना सुरक्षित बाहेर काढून आयटीबीपी कँपमधे हलवण्यात आलं आले. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून ९ जवानांसह १६ जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे.
लोकांना बाहेर काढण्यासाठी यासाठी चिनुक आणि एम आय १७ विमानांची मदत घेतली जात आहे. अडकलेल्या लोकांसाठी पिण्याचं पाणी, औषधं आणि अन्नधान्य हेलिकॉप्टरद्वारे पोहोचवलं जात असल्याचं उत्तरकाशीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. पुरात ज्यांच्या इमारतींचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी सामुदायिक स्वयंपाकघरांची व्यवस्था केल्याचंही ते म्हणाले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल रात्री आपत्ती नियंत्रण कक्षातून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
दरम्यान, चमोली जिल्ह्यात पिपलकुटीजवळ दरड कोसळल्यानं बद्रीनाथ आणि हेमकुंड साहीब यात्रा स्थगित करायचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.