उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे ११ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी दिली. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि औषधाची सोय करण्यात आली आहे. उत्तराखंडमधे पुरात अडकलेल्या नागरिकांमधे महाराष्ट्रातल्या ५१ नागरिकांचा समावेश आहे. त्यांचा नातेवाईकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं म्हटलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उत्तराखंडच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच डोंगराळ भागात अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.