उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्याच्या हरसिल आणि धराली भागांत अलिकडेच झालेल्या दुर्घटनेनंतर, अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत, बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरनी एकूण २५७ उड्डाणं केली असून, या दुर्घटनेनंतर, आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. वीज, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा नियमित पुरवठा सुरू केला गेला आहे, रस्ते बंद असल्यानं घोड्यांवरून खाद्यान्न पुरवठा केला जात आहे.
सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं तसंच मदत कार्याचा वेग आणि परिणामकारता वाढवण्यासाठी बाधित क्षेत्रांची विभागणी करावी असे निर्देश उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची पथकंही उत्तरकाशी आणि पौरी जिल्ह्यांमध्ये पाठवली गेली आहेत. ही पथकं एका आठवड्यात आपला अहवाल सादर करतील.