उत्तर प्रदेशात प्रयागराज, आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. यमुना नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका मथुरा जिल्ह्याला बसला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरामुळे मथुरा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
मथुरा जिल्ह्यातून ५ हजार जणांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. आग्रा जिल्ह्यातही यमुनेला आलेल्या पुराचं पाणी ताजमहालाच्या परिसरात शिरलं आहे. प्रयागराज जिल्ह्यात गंगा आणि यमुना नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.