January 5, 2026 1:30 PM | US | Venezuela

printer

अमेरिका व्हेनेझुएलावर तेल निर्यातबंदी लादणार; चीनकडून अमेरिकेचा निषेध

अमेरिका व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देणार नसून राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेल निर्यातबंदी लागू करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचं सरकार अमेरिका चालवेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी हे विधान केलं आहे. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. त्यानंतर डेल्सी यांनी अमेरिकेला व्हेनेझुएलातल्या कच्च्या तेलाचे स्रोत वापरण्याची, त्याचं नियमन करण्याची मुभा द्यावी, अन्यथा वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल अशी ताकीद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

 

चीनने अमेरिकेचा तीव्र निषेध केला आहे. जगाचे न्यायाधीश म्हणून अमेरिकेने वागू नये असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेची गुंडगिरी वाढत असून सर्व देशांचं सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जपलं गेलं पाहिजे असं चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे. 

 

दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलात केलेल्या लष्करी कारवाईत क्युबाचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी मारले गेल्याचं क्युबानं म्हटलं आहे. मृत अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी क्युबाने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.