अमेरिकेनं भारतावर लादलेल्या २५ टक्के आयात शुल्काबाबत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत निवेदन केलं. अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर केलेल्या शुल्कवाढीच्या परिणामांची तपासणी सरकार करत असून देशाचं हित जपण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील, असं त्यांनी सांगितलं. याविषयी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थांशी चर्चा केली जाईल, असंही गोयल म्हणाले.
अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल, दोघांनाही फायदा होईल असा व्यापार करार करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दोन्ही देशात चर्चा सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था बुडित निघालेली आहे, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचं त्यांनी खंडन केलं. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून लवकरच जगातली तिसऱी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.