अमेरिकेनं आजपासून सुमारे ७० देशांकडून आयात मालावर १० ते ५० टक्के वाढीव शुल्क लागू केलं आहे. अमेरिकेच्या दृष्टीनं अनुचित व्यापारप्रथांना विरोध करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हे पाऊल उचललं आहे. त्यात युरोपीय संघातले देश, जपान आणि दक्षिण कोरियावर १५ टक्के तर ब्राझिलच्या काही उत्पादनांवर ५० टक्के पर्यंत आयातशुल्क लागू झालं आहे. सेमीकंडक्टरच्या आयातीवर १०० टक्के पर्यंत शुल्क आकारण्याचा मानस ट्रंप यांनी जाहीर केला आहे. रशियाकडून इंधन तेल विकत घेतल्याबद्दल चीनवर आणखीही कर वाढवण्याची शक्यता ट्रंप यांनी वर्तवली आहे.
दरम्यान ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच एकमेकांची भेट घेणार असल्याचं रशियन सरकारच्या सूत्रांनी सांगितलं. युक्रेनमधे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेनं रशियाला दिलेली मुदत उद्या संपत आहे. अमेरिका, रशिया आणि युक्रेन अशी त्रिपक्षीय बैठक घेण्याची कल्पना अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी काल पुतीन यांच्याशी बोलताना मांडली, मात्र त्यावर रशियाने मौन बाळगलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.