अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत संकोच व्यक्त केला आहे. युक्रेन आणि रशिया मधल्या संघर्षामुळे वाढत असलेल्या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची भेट घेतली. अमेरिकेच्या सैन्यालाही या क्षेपणास्त्रांची गरज असल्याचं कारण देत, त्यांनी क्षेपणास्त्र पुरठ्याबाबत असमर्थता व्यक्त केली. युक्रेन आणि रशियानं सध्याच्या युद्धरेषा परिस्थिचा स्विकार करून युद्ध थांबवावं असं आवाहनही त्यांनी केलं.
या भेटीत झेलेंस्की यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या बदल्यात अमेरिकेला ड्रोनचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. गाझा युद्धबंदी कराराबद्दलही त्यांनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलं, तसंच अमेरिकेच्या सहकार्यानं हे युद्धही संपवू शकतो असं मत व्यक्त केलं.
दरम्यान युक्रेनला या क्षेपणास्त्राचा पुरवठा केला, तर अमेरिका आणि रशियातील संबंधांना मोठं नुकसान होईल असा इशारा रशीयानं दिला आहे. तर त्याचवेळी ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं परस्परांची भेट घेण्याला सहमती दर्शवलीली आहे.