दावोसमधे गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता मंडळाची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दावोसमधे गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने शांतता मंडळाची घोषणा केली. यावेळी भारताचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. ट्रम्प यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शांतता मंडळासाठी निमंत्रण दिलं होतं. फ्रान्स, ब्रिटन, चीन, जर्मनी आणि हमासही शांतता मंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले.  तर अर्जेंटिना, अर्मेनिया, अजरबैजान, बहरीन, बेलारूस इजिप्त, हंगेरी, कझाकिस्तान, मोरोक्को, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब आणि व्हिएतनाम हे देश ट्रम्प यांच्या बैठकीला उपस्थित होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या बाबतीच भारत द्विराष्ट्र तोडग्याबद्दल आग्रही आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करावं आणि दोन्ही देशांनी शांततेत नांदावं असं भारताचं मत आहे. 

 

चीनने देखील अमेरिकेच्या शांतता मंडळात सामील व्हायला नकार दिला आहे. चीनच्या भारतातील दुतावासाचे प्रवक्ता यू जिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीचं पालन करण्यास आणि संयुक्त राष्ट्राच्या चार्टरनुसार आंतरराष्ट्रीय संबंधांचं नियमन करण्यास चीन वचनबद्ध आहे, असं यू जिंग म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.