नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षासह जगभरात सुरू असलेली ८ युद्धं आपण थांबवल्याचा आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला. जगातल्या इतर कोणत्याही नेत्याने अशी कामगिरी केलेली नाही, त्यामुळे आपण नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहोत, याचा पुनरुच्चारही त्यांनी व्हाइट हाऊस इथं वार्ताहरांशी बोलताना केला. आपण नवी युद्धं सुरू होण्यापासूनही थांबवली, असंही ट्रम्प म्हणाले. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष थांबवण्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हात नाही, पाकिस्तानच्या विनंतीवरूनच हा संघर्ष थांबवण्यात आला, या भूमिकेवर भारत ठाम आहे.