भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार विषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे.
दोन्ही देशांची शिष्टमंडळं या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. उज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली असून आपण लवकरच ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे भारत-अमेरिका संबंधांबाबत भाष्य केलं होतं. भारताबरोबरच्या व्यापार संबंधांमधे आलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधणार असून या दोन्ही महान राष्ट्रांमधील चर्चा यशस्वी होण्यात काही बाधा येईल असं मला वाटत नसल्याचं ते म्हणाले.