अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेनं गाझा पट्टीत शांतता स्थापन करण्याबाबतचा नियोजन आराखडा प्रकाशित केला. गाझा पट्टीला दहशतवादमुक्त करुन तिथल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागाचा पुनर्विकास केला जाईल. दोन्ही बाजूंनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यास युद्ध तत्काळ थांबवण्यात येईल असं या आराखड्यात म्हटलं आहे.
हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सर्व लष्करी कारवाया थांबवून सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसंच परस्परांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांनाही मुक्त केलं जाईल. हमासच्या सदस्यांनाही गाझा पट्टी सोडण्यासाठी मदत केली जाईल आणि कोणत्याही अडथळ्याविना गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्रं तसंच इतर संस्थांची मदत पोहोचवली जाईल असं या शांतता प्रस्तावात म्हटलं आहे.