युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच ७० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -NPCI नं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, २ ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे ७० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या दोन वर्षांत UPI व्यवहारांची दैनंदिन संख्या दुपटीनं वाढली असली, तरी एकूण व्यवहारांच्या रकमेच्या वाढीचा वेग गेल्यावर्षांच्या तुलनेत मंदावला आहे. केंद्र सरकारनं UPI च्या माध्यमातून दररोज १०० कोटी व्यवहारांचं लक्ष्य ठेवलं असून ते पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात UPI प्रणालीनं सुमारे एक हजार ९५० कोटी व्यवहार नोंदवले असून त्यांची एकूण किंमत २५ लाख कोटी रुपयांहून अधिक होती. सध्या भारतात ८५ टक्के व्यवहार हे UPI च्या माध्यमातून होतात. तर जगभरातील एकूण रिअल टाईम डिजीटल व्यवहारांपैकी सुमारे ५० टक्के व्यवहार हे UPI द्वारे केले जातात.