वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील नावीन्य, शाश्वतता, आणि जागतिक स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याप्रति केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष नीलम शमी राव यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत विविध संस्थांमध्ये सध्या सुरू असलेले कार्यक्रम, त्यांची संस्थात्मक कामगिरी आणि धोरण अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्या १३ आ १४ नोव्हेंबर असे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या, मुंबईतल्या शासकीय संस्था, निर्यात परिषदा आणि संशोधन संघटनांच्या समन्वित प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
या भेटीदरम्यान, नीलम राव यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्याच केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्य आणि केंद्र दोन्हीचा समन्वय साधण्यावर, तसेच या क्षेत्राच्या विकासावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
वस्त्रोद्योग समितीच्या आढावा बैठकीने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी सिंथेटिक अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशनला भेट दिली. संस्थेत सध्या सुरु असलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग, मानवनिर्मित तंतू आणि हरित वस्त्राच्या नवोन्मेषातील संशोधन आणि विकास कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
विकास आयुक्त – हातमाग यांच्या कार्यालयातील विणकर सेवा केंद्रात राव यांनी, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम, समूह विकास कार्यक्रम आणि प्रदर्शने, रचना नवोन्मेष आणि विणकरांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म यांसारखे विपणन उपाय, अशा योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यानंतर, त्यांनी सुती वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेला भेट दिली, आणि सुती कापड निर्यात क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला.
सचिवांनी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयात एक सर्वसमावेशक आढावा बैठक सुद्धा घेतली, यामध्ये मंत्रालयाच्या पीएम मित्र पार्क्स योजना, वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि समर्थ कौशल्य विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.