भारत-युरोपीयन संघ मुक्त व्यापार कराराला या वर्षअखेरीपर्यंत मूर्त स्वरुप येईल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन संघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच यांनी व्यक्त केला आहे. बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथे काल झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी जागतिक व्यापार आव्हानांचा सामना करण्याविषयी चर्चा झाली.
या बैठकीत व्यावसायिकांसाठी बाजारपेठेत प्रवेश वाढवणं, विश्वासार्ह तसंच वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन देणं आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या वाढीला चालना देण्यासाठी भागीदारी दृढ करणं यावर चर्चा झाल्याची माहिती गोयल यांनी आपल्या समाजमाध्यमावर दिली. या बैठकीची पुढची फेरी येत्या १२ मे ते १६ मे दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे.