क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र

देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. देशातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून या अभियानात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनीही सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रातून केंद्राने केलं आहे.

 

सर्व कारागृहं तसंच सुधारगृहांमध्ये १०० दिवसांच्या या अभियानाचं आयोजन करण्यात यावं, असे निर्देशही या पत्रात दिले आहेत. कारागृहांची रचना आणि त्यात असलेली कैद्यांची संख्या यांमुळे क्षयरोगाचा संसर्ग वाढण्यासाठी पूरक वातावरण तयार होतं. कैद्यांना भेटायला येणाऱ्या कुटुबीयांमार्फत मग त्याचा प्रसार होतो, त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यांचे आरोग्य विभाग, राज्य तसंच जिल्हा पातळीवरचे क्षयरोग निवारण अधिकारी यांच्या मदतीने कारागृहांमध्ये निःक्षय शिबिराचं योजन करण्यात यावं. तसंच, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान सर्वांना निःक्षय शपथ द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेत निःक्षय अभियानांतर्गत निःक्षय वाहन क्ष किरण यंत्राचं अनावरण आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या वाहनातल्या क्ष किरण यंत्राच्या मदतीने क्षयरोगाचं निदान केलं जाणार असून नांदेड शहराला क्षयरोगमुक्त करण्याचा मानस डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केला.