२०४७ पर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी कृतिदल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते.
अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं. फक्त अंमली पदार्थविरोधी ब्युरो आणि गृहमंत्रालय नाही, तर याच्याशी संबंंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे विभाग, तसंच अंमली पदार्थविरोधी कृतिदलांनी यासाठी काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. अंमली पदार्थांविरोधातली कारवाई आणि जनजागृतीची दिशा बदलण्याची गरज शहा यांनी अधोरेखित केली.
देशाच्या सीमारेषांवर अंमली पदार्थ पोहोचवणारे, सीमारेषांवरून विविध राज्यांपर्यंत नेणारे आणि तिथून पानाच्या दुकानांवर किंवा तत्सम ठिकाणांपर्यंत पोहोचवणारे अशा तीन प्रकारच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करायची वेळ आली असून त्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांनी ही लढाई आपली मानावी, असं ते म्हणाले. या दिशेने सुरू असलेली विविध कामं, मोहिमा आणि कारवायांची माहितीही शहा यांनी दिली.
सध्या देशभरात ३७२ जिल्हे, १० कोटी नागरिक आणि ३ लाख शिक्षणसंस्था अंमली पदार्थविरोधी अभियानासोबत काम करत आहेत, मात्र हे पुरेसं नाही, सर्व जिल्हे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत ते पोहोचायला हवं, असं मत शहा यांनी मांडलं.