डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकमहोत्सवापर्यंत भारत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतीय स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षं पूर्ण होत असताना विकसित झालेला भारत हा नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. कौटिल्य इकोनॉमिक कॉनक्लेव्हच्या तिसऱ्या आवृत्तीत त्या बोलत होत्या. हजारो वर्षांपासून भारताने तत्त्वज्ञान, राजकारण, विज्ञान आणि कला या क्षेत्रांमध्ये जे योगदान दिलं आहे, त्याचा विस्तार जगभरात झाला आणि भारताच्या या सामर्थ्याचा उर्वरित जगाला फायदा झाला असंही त्या म्हणाल्या.

तीन दिवस चालणाऱ्या या कॉनक्लेव्हमध्ये हरित संक्रमणासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा, आर्थिक प्रगतीच्या अनुषंगाने होणारे आर्थिक-भौगोलिक विखंडनाचे परिणाम तसंच, धोरणात्मक तत्व आणि आर्थिक लवचिकता या संकल्पनांवर चर्चा होईल. तसंच, भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथच्या अर्थव्यवस्थांना भेडसावणाऱ्या काही मुद्द्यांवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांमध्ये चर्चाही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी या कॉनक्लेवला संबोधित करणार आहेत.