भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे; आणि या संदर्भात काम सुरू झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांनी केलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं, काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत त्या बोलत होत्या.
केंद्र सरकारनं २०१४ पासून व्यवसाय सुलभतेसाठी असंख्य सुधारणात्मक उपाययोजना केल्या असून, धोरणात्मक सातत्य आणि पारदर्शकतेमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. वस्तू आणि सेवा करात करण्यात आलेल्या दर कपातीमुळे उत्पादन क्षेत्रात मागणी आणि गुंतवणूक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे गेल्या मार्च महिन्यात, देशाची निर्यात ६१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे, अशी माहिती सितरमण यांनी दिली.