केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रोजगाराशी संलग्न सवलत योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. १ कोटी ९२ लाख युवकांना याचा लाभ मिळेल, अशी आशा माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती देताना व्यक्त केली. त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांना दरमहा ३ हजार रुपये या प्रमाणे २ वर्ष मदत मिळेल. उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांना आणखी दोन वर्षांसाठी हे अनुदान मिळेल. यामुळं अडीच कोटींहून अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा वैष्णव यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रिमंडळानं एक लाख कोटी रुपयांच्या निधीसह संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेलाही मंजुरी दिली. याशिवाय राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ ला देखील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली.
ट्रेनिंग, कोचिंग आणि खेळाडूंना सर्वांगीण पाठबळ यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणं हे या धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. नव्या क्रीडा धोरणात लहान वयातल्या प्रतिभावान खेळाडूंना शोधून त्यांच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी काम केलं जाईल. ग्रामीण आणि शहरी भागात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करणं तसंच स्पर्धात्मक लीग आणि स्पर्धा सुरू करण्यावर या धोरणाचा भर आहे. महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, आदिवासी आणि दिव्यांगांचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम सुरू केले जाणार आहेत. देशी आणि पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देत क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण करण्याला चालना दिली जाईल. या अंतर्गत शाळा, महाविद्यालयं आणि कामाच्या ठिकाणी तंदुरुस्ती निर्देशांक लागू करण्यात येणार आहे.