केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या ४ हजार ५९४ कोटी रुपयांच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला.
सेमिकंटक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी सरकार एक बळकट परिसंस्था तयार करत आहे, असं वैष्णव यावेळी म्हणाले. गेल्या अकरा वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा टक्के वाढ झाली असून निर्यातीत आठ टक्के वाढ झाली आहे. तर मोबाईल उत्पादन युनिट्सची संख्या तीनशेपर्यंत पोहोचली आहे. चिप डिझाइनसाठी सरकार स्वदेशी कंपन्या, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं. सेमिकॉन इंडिया २०२५ चं आयोजन २ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत करण्यात येणार असून यात सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपान सहभागी होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
लखनऊ मेट्रो फेज-१बी प्रकल्पालाही मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी ५ हजार ८०१ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. अरुणाचल प्रदेशातल्या शि योमी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तातो-२ जलविद्युत प्रकल्पाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ७०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे अरुणाचल प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.