युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या नवी स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स, कर्नाटकमधलं सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय प्रदेश, मेघालयातल्या गुहा, नागा हिल ओफिओलाईट, आंध्र प्रदेशातलं एरा मट्टी दिब्बालू, तिरुमला टेकड्या आणि केरळमधल्या वर्कला इथले उंच कडे यांचा समावेश आहे.
पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ही रचना लाव्हारसाच्या ४० पेक्षा जास्त थरांमुळे निर्माण झाली असून दख्खन पठाराचा हा भाग जांभा दगडापासून बनलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या भूभागांपैकी एक आहे. या समावेशामुळे तात्पुरत्या यादीतल्या भारतीय स्थळांची संख्या ६९ इतकी झाली आहे. यात ४९ सांस्कृतिक वारसा स्थळं, १७ नैसर्गिक आणि ३ मिश्र वारसास्थळांचा समावेश आहे.