अखेर, ठाकरे बंधू एकत्र!

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येत असल्याची घोषणा आज मुंबईत वार्ताहर परिषद घेऊन उद्धव आणि राज ठाकरे यांनी केली. मुंबईचा पुढचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण जागा वाटप आणि अन्य माहिती देणं टाळलं. 

नाशिक महापालिकेसाठी युती झाली असून उर्वरित महापालिकांच्या संदर्भात एक-दोन दिवसांत शिक्कामोर्तब होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी ही युती झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

महाविकास आघाडी कायम असली तरी महापालिका निवडणुकांसाठी आमच्या दोन्ही पक्षांची युती झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली असून शरद पवारांच्यासोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.