इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यूनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांनी प्रादेशित स्थैर्याचं महत्त्व अधोरेखित करताना अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.
इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असून तो धोका कमी करण्यासाठीच अमेरिकेने कारवाई केल्याचं स्टार्मर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियानंही अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करताना फ्रान्सनं आपला या हल्ल्यांमध्ये किंवा हल्ल्यांच्या नियोजनामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. या प्रदेशात संघर्ष टाळण्यासाठी तिन्ही देशांनी संयम राखण्याचं आवाहनही फ्रान्सनं केलं आहे.
आयर्लंडचे उपप्रधानमंत्री सायमन हॅरिस यांनीही या सगळ्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघर्षामुळे धोका उद्भवेल अशी भीती सौदी अरेबियाने व्यक्त केली असून संयम बाळगावा असं आवाहन या देशांना केलं आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या तणावाचे गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.
तर ओमाननंही अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचं हे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.