पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा मागील भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्य़ा सुटका आणि बचाव कार्य करत आहेत.
आतापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही इमारत अनधिकृत होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली होती अशी माहिती वसईविरार महापालिका आयुक्तांनी दिली.