प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद सरकारी रुग्णालयात विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेलं विमान अवघ्या काही क्षणातच अहमदाबाद विमानतळाच्या जवळ कोसळल्याने काल हा अपघात झाला. या अपघातात १२ कर्मचाऱ्यांसह २४१ जणांचा मृत्यू झाला.
अहमदाबादमधल्या या दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. इतक्या क्षणार्धात एवढे जीव गमावण्याचं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या ३२ जणांवर उपचार सुरू असून गंभीररीत्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली आहे.
अपघातस्थळी अजूनही मदतकार्य चालू आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं कामही सुरु आहे.
या दुर्घटनेबद्दल जगभरातून शोक व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही एक भयानक दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. फ्रांस, रशिया, युक्रेन, मालदिव, कॅनडा, सिंगापूर या देशांच्या प्रमुखांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र सहवेदना व्यक्त केली आहे.
काल दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या वैमानिकानं ‘मेडे’चा संदेश पाठवला होता, ज्यामध्ये विमानाच्या परिस्थितीबाबत अनिश्चिततेचा इशारा देण्यात आला होता. वैमानिक सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली या विमानाने उड्डाण केलं होतं. सभरवाल यांना ८२०० तासांचा तर कुंदर यांना अकराशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. या पार्श्वभूमीवर अपघाताची चौकशी केली जात आहे. विमान निर्माता बोईंग कंपनी एअर इंडियाच्या संपर्कात असल्याचं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या अपघातानंतर काल बोईंग कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले.
दरम्यान, या विमान दुर्घटनेच्या तपासात अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे तपास पथक चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे, या तपासात भारतीय अधिकाऱ्यांना हे पथक मदत करणार असल्याचं सुरक्षा मंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.