डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली – प्रधानमंत्री

महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपाला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अकोला इथं एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची सेवा करण्यात वेगळंच सुख मिळतं, असंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार कोटी गरिबांना घरं दिली, शिवाय तीन कोटी नवीन घरं बांधायला सुरुवात केली असून यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो गरिबांना पक्की घरं मिळतील, असं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं मराठी भाषेला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव केला आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. राज्यात टेक्सटाइल पार्कच्या उभारणीमुळे कापूस शेतकऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर त्यांनी भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार निवडून देण्याची विनंती मतदारांना केली.