लोक-सहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात आज ते बोलत होते. आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते. यासंदर्भात मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंश ही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत, समाजातल्या प्रत्येक घटकाला त्रास दिला गेला. मात्र भारताच्या जनतेनं न झुकता आपलं सामर्थ्य दाखवलं, आणीबाणी हटली आणि आणीबाणी लादणारे पराभूत झाले असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह, देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. जगातल्या मोठमोठ्या शहरांमधे झालेल्या योग दिन सोहळ्याच्या छायाचित्रांमध्ये शांतता, स्थैर्य आणि संतुलनाचं दर्शन घडल्याचं मत त्यांनी मांडलं.
नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्यांनी देशभरात केल्या जात असलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचा उल्लेख केला. पुण्याचे रमेश खरमाळे वन संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. मन की बात मधे आपल्या कार्याचा उल्लेख झाल्याबद्दल रमेश खरमाळे यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून कार्बन तटस्थता गाठल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. लहानसहान सवयींमधून जेव्हा सामूहिक निर्धार उभा राहतो तेव्हा निश्चितपणे फार मोठं परिवर्तन घडून येतं असं ते म्हणाले. एक पेड, माँ के नाम या अभियानात सहभागी होण्याचं आणि भावी पिढ्याचं भविष्य सुरक्षित करण्याचं त्यांनी आवाहन श्रोत्यांना केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षा पर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेनं पुढे जात असल्याचं ते म्हणाले. देशातल्या ६४ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येला आता सामाजिक सुरक्षा विषयक योजनांचा लाभ मिळत असल्याचं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अलिकडच्या अहवालात म्हटलं आहे, अशी माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. २०१५ पर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी २५ कोटींपेक्षा कमी होते. ते आता ९५ कोटी झाले आहेत असं ते म्हणाले. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास या मंत्राच्या आधारे भारत आपलं नवं भविष्य उभारत असल्याचं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी देशभरातली महिला उद्योजकतेची प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उतरलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी देखील ते बोलले.