सागरी व्यापार संरक्षित करून भारतीय नौदल देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील-राष्ट्रपतींचा विश्वास

भारतीय नौदल नेहेमीच देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करत राहणार असून, 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि योगदान देत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. ओडिशातील पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदल दिनाच्या समारंभात त्या बोलत होत्या. सागरी व्यापार संरक्षित करून नौदल एकप्रकारे देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ट्रायडंटच्या वर्धापन दिनानिमित्त नौदल दिन साजरा करण्यात येतो. काल पुरी इथे झालेल्या कार्यक्रमात नौदलाच्या 15 हून अधिक जहाजं, पाणबुड्या, 40 हून अधिक विमानं आणि सागरी कमांडोजनी साहसी प्रदर्शन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज भुवनेश्वरमध्ये ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 40 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.