चौथी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम यंदा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्यावरुन ओळख पटवणे या तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आहे.
देशभरातल्या अठराशे पन्नासपेक्षा जास्त जिल्हे, शहरं आणि तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. दुर्गम भागातल्या निवृत्तीवेतन धारकांना जोडण्यासाठी निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, निवृत्ती वेतन धारक कल्याण संघटना, रेल्वे अशा संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.