सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हे स्मारक विषमतेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नायगावचं नाव बदलून सावित्राबाई फुले यांच्या नावावरून ठेवायचा निर्णय जर इथल्या ग्रामसभेनं घेतला, तर विनाविलंब त्याला मान्यता देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं. महात्मा फुले यांचं मूळ गाव असलेल्या कटगुणमध्ये मोठं स्मारक उभारण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिलं. आज राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रम झाले.
मुंबईत लोकभवन इथं सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधल्या मुंबई नाका इथं सावित्रीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तर, बीड शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शन, दुर्मिळ वस्तू, नाणी संग्रह, सावित्रीबाईंच्या जीवनप्रवासाची रेखाचित्रं, तसंच दुर्मिळ पक्षांच्या छायाचित्र दालनाचं उद्घाटन कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते झालं. परभणीत पूर्णा तालुक्यात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या वेशभूषा साकारून त्यांचा जीवनपट सादर केला.