राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ पीक स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाचे मानकरी सातारा जिल्ह्यातले

राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ पीक स्पर्धेत पहिले चार क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळवले आहेत . सातारा जिल्हा कृषी अधीक्षकांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल अशा ११ पिकांसाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली होती. शेतकऱ्यांनी मिळवलेली उत्पादकता ही त्या पिकाच्या गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या दीडपट किंवा त्याहून अधिक असल्यास ते या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. राज्यस्तरावरचे विजेते ठरल्यानंतर, आता उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरचे तसंच तालुकास्तरावरचे विजेते शेतकरी निवडले जाणार असून आदिवासी गटांकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत.