भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत.
त्याआधी, भारतानं आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावसंख्येवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद राहिला. गिलने एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाचीही आज बरोबरी केली. कालच्या २ बाद ३१८ धावसंख्येवरुन आपला पहिला डाव सुरु करणाऱ्या भारतानं सकाळी आपला तिसरा गडी झटपट गमावला. काल दिवसअखेर १७३ धावांवर नाबाद असलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या २ धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर मात्र कर्णधार शुभमन गिल आणि नितीशकुमार रेड्डीनं चौथ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी केली.