तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकनं आरटीसी बसला धडक दिल्यामुळे ही घटना घडली. विकाराबादच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आलं. तसंच २० जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. माहितीसाठी ९९१२९१९५४५ आणि ९४४०८५४४३३ या क्रमांकांवर संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलं आहे. विशेष वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.