तामिळनाडूत करूर इथं काल झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. ५० पेक्षा जास्त जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षानं ही सभा आयोजित केली होती. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं या घटनेबद्दल राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उप-राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयाची मदत जाहीर झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना दहा लाख रुपयांची तसंच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्यांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या मेळाव्याचे आयोजक विजय यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. करूरमधल्या काँग्रेस खासदार जोतिमणी यांनी सांगितलं की अशी दुर्घटना करूरसाठी अभूतपूर्व असून तमिळनाडू काँग्रेसनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये मदत जाहीर केली आहे.