तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात दोन बस एकमेकांवर समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५४ जण जखमी झाले आहेत. शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुपात्तुल भागातल्या पिलायरपाटी जवळ हा अपघात झाला. तिरप्पुर ते काराईकुडु जाणारी बस कारायकुडी ते डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरसमोर धडकली. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबाला २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत घोषित केली आहे. जखमींना लवकर बरं वाटावं, अशी सदिच्छाही त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.