अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५८ जवान ठार झाले. अफगाणिस्तानातल्या पक्तिका प्रांतातल्या एका बाजारपेठेवर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं अफगाणिस्ताननं म्हटलं आहे. अफगाणिस्ताननं सीमावर्ती भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे ३० जवान जखमी झाल्याची, तालिबानचे ९ सदस्य ठार झाल्याची आणि सुमारे १८ जण जखमी झाल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी दिली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात काल रात्रीपासून तीव्र संघर्ष सुरु आहे. कुनार-कुर्रम भागात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु असून, तोरखम आणि चमन भागातली सीमा बंद करण्यात आल्यामुळे, शेकडो ट्रक अडकून पडले आहेत. दरम्यान, पाकिस्तानला शांतता नको असेल तर अफगाणिस्तानकडे इतर पर्याय असून, अफगाणिस्तान आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करेल, असा इशारा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी दिला आहे.