देशात अवैध बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्य सरकारं, भारतीय रिझर्व बँक, सक्तवसुली संचालनालय, आणि दूरसंवाद नियामक प्राधिकरण-ट्राय ला नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने गूगल इंडिया, ॲपल इंडिया, ड्रीम इलेव्हन, मोबाईल प्रीमीयर लीग आणि ए ट्वेंटीथ्री गेम्स या कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे.
चित्रपटसृष्टीतले तारे, क्रिकेटपटू आणि इतर प्रभावशाली मान्यवरांनी अशा बेटींग ॲपविषयी सर्वसामान्यांची दिशाभूल केल्याबाबतची तक्रार गेल्या मार्चमधे तेलंगण पोलीसात दाखल झाली होती. तसंच बेटींग करुन झालेलं कर्ज फेडता येत नाही म्हणून तेलंगणात २४ जणांनी आत्महत्या केल्याचं सांगणारा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता, त्या आधारे ही जनहित याचिका दाखल झाली आहे. पुढची सुनावणी येत्या १८ ऑगस्टला आहे.