अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली,  आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एजी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. अरवली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं  आवश्यक आहे, आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयाने सांगितलं. 

 

नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार, अरावली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीतकमी १०० मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे. अरावली टेकड्यांबाबतचे निकष सौम्य केल्यामुळे या भागातलं  खाणकाम आणि बांधकाम प्रकल्पांना वैधता मिळेल, आणि त्यामुळे पर्यावरणाची  अपरिमित हानी होईल, असा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिला  आहे.