दिल्ली एनसीआर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही अंजारिया यांच्या पीठानं यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतराचे निर्देश दिले होते. मात्र आज त्यांनी आपल्या निर्देशांमध्ये बदल केला.
या नवीन निर्देशानुसार, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याला मनाई करण्यात आली असून त्यांच्यासाठी खाण्याच्या जागा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे तसंच, या प्रश्नाची व्याप्ती पाहता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांसंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकरणांशी संबंधित ज्या याचिका देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असतील, त्या सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले. भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.